मुंबईत १५ हजार अधिकृत फेरीवाले


मुंबई- सुमारे एक लाख अर्जदार फेरीवाल्यांपैकी केवळ १५ हजार १२० फेरीवाल्यांना मुंबई महापालिकेने अधिकृत ठरविल्याने अन्य फेरीवाल्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. या फेरीवाल्यांची माहिती संकलित करण्याचे काम सध्या पालिके तर्फे सुरू असून लवकरच त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळेल. मुंबईभर पालिकेने ८५ हजार जागा निश्चित केल्या आहेत. फे कवारीत या जागांचे वाटप होण्याची शक्यता आहे. मुंबईत फेरीवाला धोरण राबवण्याची प्रक्रीया पालिका प्रशासनातर्फे पाच वर्षांपूर्वी सुरू केली.२०१४ मध्ये पालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. सव्वा लाख अर्ज वितरीत करण्यात आले. एकूण ९९,४३५ फेरीवाल्यांनी अर्ज भरले. या फेरीवाल्यांकडून प्रशासनाने अधिवासाच्या प्रमाणपत्रासह कागदपत्रे मागवली होती. त्यानंतर शहर फेरीवाला समितीद्वारे अर्जाची छाननी करण्यात आली. ही छाननी पूर्ण झाली असून केवळ १५,१२० फेरीवाले पात्र PDA ठरले आहेत. पात्र फेरीवाल्यांना लवकरच परवाने आणि फेरीवाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यांना निश्चित जागाही दिल्या जाणार असल्याची माहिती परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. २४ वॉर्डात ज्या ठिकाणी फेरीवाल्यांना बसवता येईल अशा फेरीवाला क्षेत्राची यादीही जाहीर करण्यात आली होती. एकूण १३६६ रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून ठरवण्यात आले आहेत. या रस्त्यांवर फेरीवाल्यांसाठी ८५,८९१ बसण्याच्या जागा अर्थात 'पिचेस' आखण्यात आले होते.