प्लास्टिक पिशव्यांचे पुन्हा पीक!


प्लास्टिक पिशव्यांचे मुंबई- प्लास्टिकबंदी लागू केल्याबद्दल मिळालेल्या गुणांमुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेत मुंबई महापालिकेची कामगिरी उंचावली आहे. मात्र महापालिकेची ही प्लास्टिकबंदी अनेक बाबतीत केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. दादर, भायखळा, बोरिवली, गोवंडी, मानखुर्द येथील मंडयांमध्ये केलेल्या पाहणीत प्लास्टिक पिशव्यांची बिनधास्त देवाणघेवाण सुरू असल्याचे दिसून आले. प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर व पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर बाजारातून बंदीयोग्य प्लास्टिकच्या वस्तू गायब झाल्या. इतकेच नव्हे तर ग्राहकांनीही प्लास्टिकच्या पिशव्यांना सोडचिठ्ठी देत कापडाच्या पिशव्यांचा वापर सुरू केला. दुकानदारांनी कापडी आणि कागदी पिशव्यांची विक्रीही सुरू केली. ग्राहकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र पालिकेची कारवाई क्षीण झाली आणि दुकानदार, फेरीवाले, ग्राहकांच्या हातात पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या दिसू लागल्या. सुरुवातीला कारवाईच्या भीतीपोटी लपूनछपून पिशव्या दिल्या जात होत्या. मात्र आता त्यांचा उघडपणे वापर होऊ लागला आहे. तरीही मुंबईला स्वच्छ सर्वेक्षणाच्या २०१९-२०च्या दुसऱ्या तिमाहीत स्वच्छ शहरांच्या यादीत आठवे स्थान मिळाले. लवकरच स्वच्छ सर्वेक्षणाच्या वार्षिक आढाव्यासाठी दिल्लीहून पथक मुंबईत येत आहे. तेव्हा हे पथक मुंबईच्या बाजारपेठाही तपासणार का, अशा प्रश्न आहे.