पश्चिम रेल्वेच्या अपघातांत वर्षभरात २१४ बळी


विरार : सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्याची जीवनवाहिनी समजली जाणारा लोकल रेल्वे प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरू लागला आहे. मीरा रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान २०१९ या वर्षात विविध अपघातांत तब्बल २१३ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. त्यात रूळ ओलांडताना ११० प्रवाशांना तर लोकल ट्रेनमधून पडून ४७ प्रवाशांना जीव गमवावा लागला.


विरार लोकलचा प्रवास धोकादायकच :


पश्चिम रेल्वेची विरार, वसई, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोड ही गर्दीची स्थानके आहेत. या स्थानकातून सकाळी व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी चढणे व उतरणे कठीणच जाते. कारण ट्रेनमधले काही प्रवासी दरवाजे अडवून ठेवतात. त्यामुळे अनेक प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करतात. गाडी सुरू झाल्यावर हात सटकून अथवा खांबाला धडकून अपघात होतात. 


वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत मीरा रोड ते वैतरणा या रेल्वे - स्थानकांचा समावेश होतो. या स्थानकात २०१९ या वर्षात २१३ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. यामध्ये रूळ ओलांडताना तसेच ओव्हरहेड वायरचा धक्का लागल्याने ११० प्रवाशांचा मृत्यू झाला. धावती ट्रेन पकडण्याच्या नादात ५७ प्रवाशांचा तर धावत्या ट्रेनमधून पडून ४७ प्रवाशांचा मृत्यू झाला. याच भागात २०१८ या वर्षात २४६ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. रेल्वे अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे विविध उपायोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०१९ या वर्षांत मृत्यूंच्या संख्येत ३३ ने घट झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. मागील वर्षी रेल्वे रुळ ओलांडताना १५१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. रूळ ओलांडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती आणि दंडात्मक कारवाई केली जाते.