महापालिकेकडून बेस्टला आर्थिक बळ; दरमहा शंभर कोटींची मदत, सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय


मुंबई- डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्र माला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अखेर महापालिकेने पावले उचलली आहेत. दरमहा शंभर कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय महापौर दालनात आयोजित सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यास अनुकूलता दशविल्यामुळे बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन होण्याचीही चिन्हे आहेत. कर्जाचे डोंगर, आणखी कर्ज देण्यास बँकांनी दिलेला नकार, प्रवासी संख्येत घट आणि वाढती तूट अशा अडचणींमध्ये सापडलेल्या बेस्ट उपक्र माला टाळे लागण्याची वेळ आली आहे. कामगारांचे वेतन देण्यासाठीही बेस्टच्या तिजोरीत पैसे नाहीत. यामुळे पालक संस्था असलेल्या महापालिकेने बेस्ट उपक्रमाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी सर्व राजकीय पक्ष, बेस्ट समिती आणि कामगारवर्गाकडून होत आहे. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेत विलीन करण्याचा ठरावही एकमताने पालिका महासभेत मंजूर करण्यात आला होता.