बेस्टच्या तिजोरीत १२ कोटींची नाणी


मुंबई- भाडेकपात केल्यानंतर बेस्टकडे सुट्या पैशांचा ढीगच लागला आहे. बेस्टकडे १२ कोटी रुपयांची नाणी जमा झाली आहेत. जमा झालेले सुटे पैसे नेण्यासाठी कंत्राट दिलेल्या कंपनीने ती नेण्यास टाळाटाळ केल्याने बेस्ट उपक्रमासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. बेस्टने भाडेकपात केल्यानंतर प्रवासी संख्या वाढत गेली. तुलनेने महसुलात मात्र फारशी वाढ नाही. यात ५ किलोमीटरसाठी पाच रुपये भाडे केल्याने सुट्या पैशांची मोठी भर पडत गेली. १ जानेवारी २०२० ला बेस्टच्या सर्व आगारांत मिळून ११ कोटी ५० लाखांची सुटी नाणी जमा झाली. तर गुरुवार, शुक्रवारी आणखी ४० लाख रुपयांच्या नाण्यांची भर पडली. त्यामुळे एकूण सुट्या  पैशांचा आकडा १२ कोटींपर्यंत पोहोचला. यासंदर्भात शुक्रवारी बेस्ट समितीच्या झालेल्या बैठकीत सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी सुट्या पैशांचा मुद्दा उपस्थित रोज दीड कोटी रुपयांची चिल्लर जमा होत आहे. आगारात जमा झालेली चिल्लर व रक्कम नेण्याचे काम एका कंपनीकडे असून रोजची मोठ्या प्रमाणात असलेली सुटी नाणी नेण्यास मात्र नकार दिला आहे. कंपनी २००, ५०० आणि २००० । च्या नोटा स्वीकारते. तसेच ५ व १० रुपयांची ८० टक्के नाणी स्वीकारत असून १ व २ रुपयांच्या चिल्लरचे करायचे काय असा सवाल संबंधित अधिकाऱ्यांना पडल्याचे कवठणकर म्हणाले. त्यामुळे बेस्टला दिवसाला व्याजापोटी मिळणाऱ्या ३१ हजार रुपयांवरही पाणी सोडावे लागत असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. बेस्ट महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र कुमार बागडे यांनी बस । भाडे कमी झाल्यापासून नाण्यांची समस्या वाढली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियासोबत बोलणी सुरू आहेत. याशिवाय नाणी नेण्याचे काम दिलेल्या कंपनीला आदेश देऊन लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल असेही स्पष्ट केले.