ठाणे : दिल्ली येथे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विरोधात थाळीनाद मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला १५ लाख रूपये देतो असे सांगून महिलांकडूनच विविध प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पैसे उकळणाऱ्या एका टोळीविरोधात ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला. मुकरम अली मोहब्बत अली अन्सारी आणि त्याचे साथिदार हेमंत मनिषा, तिरूपती यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी कळव्यातील तीन महिलांची तब्बल ४२ लाख ४० हजार रूपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ____ फसवणूक झालेल्या महिला कळवा येथे राहतात. २०१७ मध्ये त्यांची मुकरम आणि त्याच्या इतर साथीदारांसोबत ओळख झाली होती. दिल्ली येथे जीएसटी विरोधात थाळीनाद मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला १५ लाख रूपये देण्यात येणार असून यातील २०० महिलांचे नेतृत्त्व करणाऱ्या महिलांना प्रत्येकी अतिरिक्त पाच लाख रूपये मिळणार असल्याचे त्यांनी महिलांना सांगितले. या महिलांनी त्यांच्या परिसरातील शेकडो महिलांना या मोर्चात सहभागी करण्याचे ठरवले. त्यानंतर मुकरम आणि त्याच्या साथिदारांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या महिलांचे अर्ज भरले. या अर्जाच्या बदल्यात मुकरमने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिन्ही महिलांकडून ६० हजार रूपये घेतले. त्यानंतर विविध प्रक्रिया पार पाडण्यासाठी टप्प्या-टप्प्याने तब्बल ४२ लाख ४० हजार रूपये उकळले. मात्र, तीन वर्षे उलटली असतानाही कोणताही मोर्चा काढण्यात आला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले.
मोर्चा काढण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक. तीन महिलांची ४२ लाख ४० हजार रूपयांची फसवणूक