जव्हार- ग्रामीण आदिवासी भागातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी करोडो रुपये निधी उपलब्ध होतो. मात्र, आजही आदिवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. त्यामुळे येथील आदिवासी मतदार वैतागले असून, नेत्यांच्या प्रचाराला येणाऱ्या कार्यकर्त्यांना, आदिवासी भागातील निधी जातो कुठे? अशी विचारणा केली जात आहे.
जव्हार तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, १०९ महसूल गावे आणि २४५ पाडे आहेत. मात्र या तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे न झाल्याने मतदारांना दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यामुळे आदिवासी मतदार यावर्षी कोणाला कौल देणार हे अनुत्तरीतच आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती बांधकाम विभाग या विभागांकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दरवर्षी करोडो रुपये येत आहेत. मात्र, तरीही तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांची परिस्थिती 'जैसे थे'च आहे.
जव्हार ते दाभोसा, सिल्वासा - गुजरात रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे. त्यातच पावसाळ्यात ठिकठिकाणी रस्ता वाहून गेल्याने दुरवस्था झाली आहे. जव्हार - वाडा - विक्र मगड रस्ता हे तालुक्यातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. आदिवासी भागातील देहेरे - मेढा रस्ता, केळीचापाडा - साकूर, झाप रस्ता, जामसर - सारसून,ढाढरी रस्ता, या ग्रामीण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची देखील दुर्दशा झालेली दिसते. दरवर्षी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी लाखोंचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था बिकट कशी, असा प्रश्न नागरिकांना भेडसावतो आहे.
तालुक्यातील काही रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण किंवा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामे झाली आहेत. परंतु हे डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते आणि बुजविण्यात आलेले खड्डे वर्षभरातच उखडून निघाल्याचे चित्र दिसते आहे. खड्डयांच्या रस्त्यांमुळे वाहन चालक आणि नागरिक वैतागले आहेत. जव्हार शहरातील मुख्य रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली असून, रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली आहे. यामुळे अपघात होत आहेत. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होते आहे.