बुलढाणा- पारंपारिक पुरूष प्रधान मानसिकतेमुळे पुरूषांना मोकळेपणाने त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. पुरुषांना सांगितले जाते की, त्यांना कठोर असणे आवश्यक आहे आणि त्यांनी कुठल्याही अडचणीत मदतीसाठी विचारणा करण्याची गरज नाही. या पारंपारिक कठोर नियमांमुळे पुरूषांना दुसऱ्यांकडे जाऊन गरजेच्या वेळी मदत मागणे अवघड होऊन बसते. पुरूषांमधील नैराश्याचे निदान होण्याच्या घटना सामोऱ्या येत नाहीत, कारण ते डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या नैराश्याच्या भावना बोलून दाखवण्यास तयार नसतात. कारण, पुरूष हा नेहमी कणखरच असला पाहिजे ही पारंपारिक भूमिका त्यात नेहमी आड येत असते. पुरूषांमधील नैराश्याची भावना ही कामाच्या ठिकाणचे प्रश्न व घरातील नातेसंबंध यांच्याशी निगडीत असते, परंतु असे असले तरी पुरूष त्यांच्या भावनांचे वर्णन हे दुःख किंवा निराशा या पद्धतीने न करता आपल्याला ताण आला आहे असे सांगून वेळ मारून नेतात. त्यात नैराश्याच्या भावनेचा स्पष्ट उल्लेख ते करत नाहीत.
एनएचपी (नॅशनल हेल्थ प्रोफाइल)च्या अहवलानुसार सन २०१७ मध्ये ३० ते ४५ वयोगटातील मध्यम वयोगटातील पुरूषांच्या झालेल्या आत्महत्येचा चिंताजनक आकडा ४४ हजार ५९३ होता. एकूण १ लाख ३३ हजार नागरिकांचा आत्महत्येमुळे मृत्यू झाला आहे. एनएचपीच्या २०१९ मधील अहवलानुसार २०१५ मध्ये महिलांच्या तुलनेत दुप्पट संख्येत पुरूषांनी आत्महत्या केल्या आहेत.