नालासोपारा- नायगाव परिसरातील जूचंद्र गावात प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वस्तात घरे देत असल्याचे सांगून मुंबईतील विविध भागात राहणाऱ्या २०० ते २५० ग्राहकांना फसवल्याचे उघडकीस आले आहे. घर पण नाही आणि घरासाठी दिलेले पैसे पण परत मिळाले नाहीत, यामुळे लाखो रुपये हडप करणाऱ्या या बांधकाम व्यवसायिकांविरुद्ध फसवणूक झालेल्या ग्राहकांनी वालीव पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २४ लाखांचे घर १४ लाखांत देतो असे सांगून सन इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीच्या सुरू असलेल्या इमारतीत मीरा रोड येथे राहणाऱ्या रिठा शेठ (५२) यांनी आणि त्यांच्या पतीने २०१७ मध्ये ५५० चौरस फुटाच्या दोन सदनिका बुक केल्या होत्या. त्या बदल्यात २ लाख ८४ हजार १०० रु पये टोकन देण्यात आले होते.
उर्वरित रक्कम सप्टेंबर २०१८ मध्ये सदनिकेचा ताबा देणार तेव्हा देण्याचे ठरले होते. याच इमारतीमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या २०० ते २५० ग्राहकांनी सदनिका बुक केल्याचे कळते. या सर्व ग्राहकांचा व्हॉट्सअॅपवर ग्रुप असल्याचेही कळते.
सदनिका देतो असे सांगून या सर्वांकडून लाखो रुपये कंपनीच्या भागीदार बांधकाम व्यवसायिकांनी घेतले. मात्र, अद्याप सदनिकेचा ताबा मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वालीव पोलिसांनी सन इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या नासिर हमीद खान, अक्रम हमीद खान, धीरज सिंग, अब्दुल उर्फ खालीक शेख, आर्षि अब्दल शेख, फारु ख खान या बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे.