नवी मुंबई- मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळालगतच्या मोकळ्या जागा पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रो मोअर फूड्स योजनेअंतर्गत ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. मात्र या ठेकेदारांच्या माध्यमातून भाजी लागवडीसाठी गटारांतील दूषित पाणी वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईत सुद्धा हा प्रकार सर्रासपणे सुरू असून त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने ग्रो मोअर फूड्स योजनेअंतर्गत नवी मुंबईतील बेलापूर ते वाशी आणि जुईनगर ते ठाणे दरम्यानच्या रेल्वेमार्गालगतच्या मोकळ्या जागा पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी ठेकेदारांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात पालेभाज्या पिकविल्या जातात. या भाज्या शहरात अगदी स्वस्तात विकल्या जातात. विशेष म्हणजे या भाज्या पिकविण्यासाठी अत्यंत दूषित पाणी वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. ___ अनेक ठिकाणी मोठ्या नाल्यातील पाणी मोटरपंपच्या साहाय्याने या भाजीच्या मळ्याला पुरविले जाते. तर तुर्भे ते ऐरोली दरम्यानच्या रेल्वेमार्गालगत पालेभाज्यांच्या लागवडीसाठी रसायन मिश्रित दूषित पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले
एमआयडीसीतील अनेक कंपन्या रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करताच लहान-मोठ्या नाल्यातून खाडीत सोडतात. या नाल्यातील दूषित पाणी भाजीचे मळे पिकविण्यासाठी वापरले जात आहे. अनेक ठिकाणी नाल्यातील पाणी खेचण्यासाठी डिझेलवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. तर कोपरी येथील रेल्वेरुळालगतच्या शेतीसाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. दूषित पाण्यावर पालक, मुळा, मेथी आदी पालेभाज्या पिकविल्या जातात. शहरातील किरकोळ विक्रेते, या भाज्या शहरातील किरकोळ विक्रेते, हॉटेल्स चालकांना थेट पुरविल्या जातात. शेजारच्या एपीएमसीमधील घाऊक मार्केटपेक्षा या भाज्या ताज्या व स्वस्त असल्याने अनेक किरकोळ विक्रेते सकाळी थेट रेल्वमार्गावर येवून भाजी खरेदी करतात. या भाज्यांची विक्री प्रामुख्याने रेल्वे स्थानकाबाहेर, लोकलमध्ये, शहरातील दैनंदिन बाजार, पदपथावरील फेरीवाल्यांकडून केली जाते.