ठाण्यातील चौक प्रदूषित!
ठाणे महापालिका क्षेत्रातील १७ प्रमुख चौकांमधील हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या असल्या तरी तीन हात नाका, नितीन कंपनी, मुलुंड चेक नाका, कापूरबावडी यासह १२ प्रमुख चौकांतील हवा प्रदूषित असल्याची बाब पर्यावरण अहवालातून समोर आली आहे. तर उवरित पाच चौकांमध्ये मात्र हवाप्रदूषणात घट झाली आहे.
वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, पादचारी पूल, उड्डाण पूल, मेट्रो प्रकल्प आणि मलनि:सारण वाहिन्या टाकणे अशी कामे सुरू असल्यामुळे धूलिकण वाढून या चौकातील हवा प्रदूषित झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. विशेष म्हणजे, दिवा कचराभूमीच्या परिसरात हवा प्रदूषण कमी झाल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे. ठाणे शहरातील सर्वाधिक वाहनांची वर्दळ असलेल्या तीन हात नाका चौकातील हवेच्या गुणवत्तेचे महापालिका पर्यावरण विभागाकडून सातत्याने निरीक्षण आणि मापन करण्यात येते. त्यामध्ये हवा प्रदूषकांमधील सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि धूलिकणाचे मापन करण्यात येते. या मापनाच्या आकडेवारीची नोंद पर्यावरण अहवालामध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार या चौकात एप्रिल २०१८ मध्ये हवाप्रदूषणाचा निर्देशांक ९० टक्के इतका होता. मात्र, मार्च २०१९ मध्ये तो १२३ टक्क्यांपर्यंत पोहचला. त्याचप्रमाणे शहरातील अन्य १६ चौकांमध्येही फेकवारी २०१९ मध्ये हवेतील प्रदूषकांचे मापन करण्यात आले होते. त्यामध्ये नितीन कंपनी चौक, मुलुंड चेक नाका, किसननगर, बाळकुम नाका, शास्त्रीनगर नाका, कॅसल मिल नाका, उपवन टीएमटी बस थांबा, माजिवाडा, मुंब्रा अग्निशमन केंद्र, कापूरबावडी नाका, कोपरी प्रभाग समिती अशा १२ ठिकाणी हवा प्रदूषित असल्याची बाब समोर आली आहे. तर पोखरण रोड नं १, वाघबीळ नाका, गावदेवी नाका, विटावा नाका, कोर्ट नाका अशा पाच ठिकाणी हवा प्रदूषण निर्देशांक गतवर्षीपेक्षा कमी झाल्याचे अहवालतून पुढे आले आहे.