कर्णकर्कश हॉर्नमुळे तीन टक्के वाहतूक पोलिसांना बहिरेपणा

मुंबई- मुंबईतील वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, नियंत्रणासाठी अपुरे मनुष्यबळ अशा विविध कारणांमुळे वाहतूक पोलिसांना ताणतणावाशी संबंधित उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांना तोंड द्यावे लागत असतानाच, त्यांना अन्य शारीरिक आजारांचाही सामना करावा लागत असल्याचे आढळले आहे. मुंबई वाहतूक पोलीस आणि केईएम रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या संशोधनानुसार, रस्त्यांवरील वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे जवळपास तीन टक्के पोलिसांना बहिरेपणा आला आहे, तर वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे डोळे आणि त्वचाविकारही पोलिसांत बळावत चालले आहेत. मुंबई शहरातील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. शहरभरात ३३ लाख वाहनांची नोंद असून दरदिवशी जवळपास ५०० ते ७०० वाहनांची यात भर पडत असते. या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी शहरात दोन हजारांहून अधिक वाहतूक पोलीस उपलब्ध असले तरी यांची संख्या तुलनेने अपुरीच आहे. रस्त्यावरील धूळ, वाहनांचा धूर यात तासन्तास उभे राहून काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशातून वाहतूक विभागाच्या पुढाकाराने संशोधनात्मक अभ्यास केला गेला. नुकतेच हे संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीन अॅण्ड पब्लिक हेल्थ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. शहरातील १९५९ वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून हा अभ्यास केला असून यात २१ ते ६० वयोगटातील वाहतूक पोलीस हवालादारापासून ते सहाय्यक आयुक्तापर्यंतच्या विविध पदांवरील व्यक्तींचा समावेश आहे. या अभ्यासानुसार, वाहतूक विभागामध्ये २६ टक्के पोलिसांना ताणतणाव, तर २० टक्के उच्चरक्तदाब आणि १४ टक्के पोलीस मधुमेहाचे रुग्ण असल्याचे नोंदले गेले. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांपेक्षा या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. सातत्याने धूळ आणि धूरामध्ये राहिल्याने श्वसनाचे, डोळ्यांचे आजारही यांच्यामध्ये प्रामुख्याने आढळून आले. दृष्टी कमी होणे, डोळ्यांची जळजळ होणे, कोरडे होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे दुखणे या तक्रारी अधिकांश असल्याचे नोंदले गेले.