पालिका कर्मचाऱ्यावर फेरीवाल्याचा चाकूहल्ला


फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यावर फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तळिंज पोलीस स्थानकात गन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपासून रस्त्यांच्या दुतर्फा बसलेल्या बेकायदा फेरीवाल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या होती. त्यामुळे अशा फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. पालिका प्रशासनावर वाढता दबाव पाहता आज वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अतिक्रमण अधिकारी गोकुळ पाटील कर्मचाऱ्यांसह गाला नगरच्या राज नगर परिसरात गेले होते. यावेळी फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका हातगाडीवाल्याशी हातापायी झाली. त्यावेळी एका महिला फेरीवाली व तिच्या इतर साथीदारांकडून चाकूहल्ला करण्यात आला. तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान, पालिका व फेरीवाल्यांमध्ये झालेल्या झटापटीत जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.