कांदा दरवाढीचा फटका हॉटेलमधील ग्राहकांवर, जेवण महागणार?

मुंबई - कांदाच्या वाढत्या दरवाढीचा फटका सध्या सामान्य जनतेला पडत आहे. दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेले असतानाच आता बाहेर खाणाऱ्यांचे देखील वांदे होणार आहेत. कांद्याचे दर कमी झाले नाही तर हॉटेल मालक हॉटेलमधील पदार्थांचे दर वाढविणार असल्याचे समजते. इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार) शुक्रवारी याबाबत संकेत दिले आहेत. 'गेल्या आठवड्यात मुंबई व उपनगरात कांद्याचे भाव १६०-१७० रुपये किलो होते. मात्र सोमवारपासून भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पण जर लवकरच हे भाव ६० रुपयांपर्यंत कमी नाही झाले तर आम्हाला कांद्याचा वापर असलेल्या पदार्थांच्या किमतीत वाढ करावी लागले. आम्ही आणखी आठवडाभर ते दहा दिवस वाट पाहू', असे आहारचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सांगितले.