भाईंदर रेल्वेपुलाला धोका? सक्शन पंपाद्वारे मध्यरात्री बेकायदा रेतीउपसा


वसई : भाईदर खाडीपुलाच्या पश्चिमेकडील भागात अनिर्बध बेकायदा रेतीउपसा करून पाचूबंदरकिल्लाबंदर किनाऱ्याची धूळधाण करणाऱ्या रेतीमाफियांनी आता भाईदर पुलाच्या अगदी जवळच मध्यरात्रीच्या सुमारास चक्क सक्शन पंपाने रेतीउपसा सुरू केल्याची बाब उघडकीस आली आहे. सक्शन पंपाने रेतीउपसा असाच सुरू राहिल्यास भाईदर खाडीपुलाला धोका पोहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी महसूल तथा पोलिसांनी त्वरेने पावले उचलून रेतीचोरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


 वसईतील नायगावपासून थेट अर्नाळा आणि तेथून वैतरणापर्यंतच्या किनारी पट्टयात बेसुमार रेती उत्खनन झाले असून परिणामी विस्तीर्ण किनारपट्टीची अक्षरश: धूळधाण झाली आहे. या पट्टयात आजही अवैध रेती उत्खनन होत असतानाही केवळ आर्थिक लाभापायी महसूल यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पाचूबंदर-किल्लाबंदरचा किनारा खचल्याने अनेक मच्छीमारांची घरे पाण्याखाली गेली आहेत. या वस्तुस्थितीकडे प्रशासनाने आतापर्यंत दुर्लक्ष केले असल्यामुळेच रेतीमाफियांचे मनसुबे बळावले असून आता त्यांनी चक्क भाईदर खाडीपुलाजवळ रात्रीच्या वेळेस चक्क सक्शन पंपाने रेतीउत्खनन सुरू केले आहे. या पुलाखालून रात्रीच्यावेळी सहा-सात सक्शन पंपांच्या साहाय्याने रेतीउपसा केला जात आहे.


यासाठी मोठया प्रमाणात  बोटीचाही वापर केला जात आहे। भाईदरच्या जुन्या रेल्वेपुलाखाली सुमारे २५ फूट अंतरावर हा उपसा केला जात असल्यामुळे जुना पूल खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच रेतीउपसा केला जात असलेल्या ठिकाणापासून मासे दूर जात आहेत. तथा माशांच्या प्रजोत्पादन प्रक्रियेत अडथळा येत असून मच्छीमारांना मासेमारी करण्यासही अडथळा येत आहे. त्यामुळे मच्छीमारांनी रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष उपसा सुरू असताना खाडीत जाऊन रेतीउपशास मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना न जुमानता त्यांच्यादेखत सक्शन पंपाने रेतीउपशा सुरू ठेवण्यात आला. या बेकायदा रेतीउपशाकडे महसूल तथा पोलीस विभाग यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.


उच्च न्यायालयाच्या आदशाच उल्लधन भाईदर


भाईदर खाडीपुलाच्या पश्चिमेकडील रेतीउपशाविरोधात पाचूबंदर- किल्लाबंदर येथील कोळी युवाशक्ती या संघटनेचा १८ वर्षापासून लढा सुरू आहे. कोळी युवाशक्तीने आतापर्यंत महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, मेरिटाइम बोर्ड, पर्यावरण विभाग यांना लेखी निवेदने देऊन या प्रश्शाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पाचूबंदरकिल्लाबंदर किनाऱ्याची होत असलेली धूप रोखण्यासाठी तत्कालीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २००६मध्ये भाईंदर पुलाच्या पश्चिमेकडे रेती उत्खननास बंदी घातली होती. तरीही रेती उत्खनन सुरूच राहिल्याने कोळी युवाशक्ती संघटनेने स्थानिक मच्छीमार संस्थांच्या सहकार्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर वसईच्या खाडीत बेकायदा रेती उपसा होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशाची पायमल्ली करून वसईच्या खाडीत आजही रेती उत्खनन होत आहे.