येस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! बँकेवरील निर्बध बुधवारी दूर होणार


मुंबई : येस बँकेवरील निबंध येत्या तीन दिवसात दूर केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे. येस बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी एसबीआय आणि इतर सात गुंतवणूकदारांनी पुढाकार घेतल्याने सरकारने बँकेवरील निर्बध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


__अर्थ मंत्रालयाने येस बँकेची पुनरुज्जीवन योजनेला शुक्रवारी संध्याकाळी हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर पुढील तीन दिवसांत म्हणजेच १८ मार्च रोजी बँकेवरील निर्बध दूर केले जातील, असे सरकारने म्हटलं आहे. ही योजना अस्तित्वात आल्यानंतर बँकेवर नव्याने संचालक मंडळ स्थापन केले जाणार आहेत्यात स्टेट बँकेचे २ संचालक असतील. अधिसूचना जारी झाल्यानंतर सात दिवसांत बँकेला संचालक मंडळ नियुक्त करावे लागणार आहे.


येस बँकेवर निबंध लागू झाल्यामुळे बँकेच्या खातेदारांना महिनाभरात ५० हजार रुपये काढण्याची परवानगी दिली होती . बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही, तसेच कोणतेही कर्ज देता येणार नाही किंवा कोणत्याही कर्जाचे पुनर्नवीकरण करता येणार नाही. कोणत्याही प्रकारची अदायगी बँकेला करता येणार नाही अशी बंधने होती. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून स्टेट बँकेचे माजी अधिकारी प्रशांत कुमार यांनी बँकेचे प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला आहे.